इयान फ्लेमिंग
जेम्स बॉंड हा नायक असलेल्या बॉंड्स कथा लिहिणारे इयान फ्लेमिंग यांचा जन्म १९०८मध्ये झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण इटॉन इथे झाले. सॅॅंडहर्स्ट इथे काही काळ घालवल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. परराष्ट्र कार्यालयात नोकरी न मिळू शकल्याने, १९३१मध्ये ते रुचर्स न्यूझ एजन्सी मध्ये रुजू झाले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, त्यांनी नौदल गुप्तहेर विभाग संचालकांचा पीए म्हणून काम केले. तेथे त्यांचा हुद्दा लेफ्टनंटवरून कमांडरपर्यंत वाढला. त्यांच्या युद्धकाळातील अनुभवांतून त्यांना गुप्त कारवायांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.
युद्धानंतर फ्लेमिंग हे केम्स्ली न्यूझ पेपर्समध्ये परराष्ट्र लेखन व्यवस्थापक बनले. त्यांनी जमैकामध्ये आपले 'गोल्डनएज' नावाचे घर बांधले. याच घरात १९५३मध्ये, वयाच्या ४२ व्या वर्षी इयान फ्लेमिंग यांनी जेम्स बॉंड कादंब्यऱ्यांपैकी पहिली, 'कॅसिनो रोयाल' लिहिली. इयान फ्लेमिंग यांचं १९६४ मध्ये निधन झाले; पण तत्पूर्वी त्यांच्या १४ बॉंड कादंबऱ्यांच्या ४ कोटीहून अधिक प्रती विकल्या गेल्या, आणि अशा प्रकारे जेम्स बॉंड हे पात्र जागतिक स्तरावर प्रस्थापित झाले.
नावाची कुळकथा
'बर्ड्स ऑफ द कॅरिबियन' या नावाच्या एका उत्कृष्ट पुस्तकाच्या लेखकाचे नाव (जेम्स बॉंड), इयान फ्लेमिंगनी आपल्या नायकासाठी वापरले. अतिशय साधे, मवाळ, व निर्विकार असे हे नाव त्यांना आवडले. बॉंडचा अधिकृत नंबर (००७) किपलिंगने अमेरिकन रेल्वेसंबंधी एका कथेमध्ये एका नवीन इंजिनासाठी वापरला होता. पहिल्या एलिझाबेथ राणीच्या मर्जीतील जॉन डी, स्पॅनिशांविरुद्ध ब्रिटिश गुप्तहेर खात्यात काम करताना ह्याच नंबरनी ओळखला जायचा.
बॉंडपट
जेम्स बॉंड हा नायक असलेल्या इंग्रजी चित्रपटांत “धिस इज बॉंड... जेम्स बॉंड!” हा हुकमी डायलॉग असे/ त्यानंतर विध्वंसाचा खेळ सुरू होतो. हा विध्वंस इमारतींचा, गाड्यांचा, विमानांचा, आणि हृदयांचा देखील असतो. जेम्स बॉंड म्हणतो, “विधायक कामांशी माझे फार सख्य नाही.” ते बरोबरच आहे.. जेम्स बॉंड हा हत्येचा परवाना घेऊन फिरणारा सर्वाधिक लोकप्रिय नायक आहे. त्याला 'सुपरहिरो' म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. आणि कोणत्याही बॉंड-चाहत्याला, जेम्स बॉंड हे एका लेखकाने निर्माण केलेले काल्पनिक पात्र आहे, यावर विश्वास ठेवायला आवडणार नाही.
जेम्स बॉंडला नैतिकतेची चाड असून, खुनी व विषयासक्त कारवायांमधील तटस्थता झुगारून आत्मक्लेशाकडे झुकणारी अशी आत्मपरीक्षणाची क्षमता त्याच्याकडे आहे. इयान फ्लेमिंग स्कॉटिश वंशाचे होते, आणि त्यांच्या मनात, बॉंडची स्वसुखलोलुपता, त्याची व्होडका मार्टिनी 'शेकन नॉट स्टर्ड', महागड्या मोर्लन्ड स्पेशल सिगारेटची तलफ, परस्त्रियांशी भावनाहीन प्रणयाराधन, वेगवान गाड्यांचे वेड, या गोष्टींबद्दल अपराधीपणाची भावना होती. लोकांचे पोषाख, त्यांच्या शरीरावरील तीळ व व्रण, एखाद्याच्या बोटाच्या लांबीतील अनियमितपणा, एखाद्याची मान किंवा कवटीचा विचित्र आकार, या गोष्टींचे मनोरंजक लिखाणांमध्ये बहुधा न आढळणारे, विस्तृत व सबळ विवेचन त्यांच्या लिखाणात येते.
जेम्स बॉंडच्याच बाबतीत बोलायचे झाले तर तो एक चिरंजीव नायक आहे, आणि त्याच्या थरारक कारवायांसाठी हे जगदेखील पुरेसे नाही.
जेम्स बॉंडचे थरारपट
इयान फ्लेमिंगच्या कादंबऱ्यांची मराठी रूपांतरे
- ऑक्टोपसी (अनुवाद : जयवंत दळवी)
- ऑन हर मॅजेस्टीज सीक्रेट सर्व्हिस (अनुवाद : अजित ठाकूर)
- कॅसिनो रॉयल (अनुवाद : सुभाष जोशी)
- गोल्डफिंगर (अनुवाद : माधव कर्वे)
- डॉ.नो (अनुवाद : विजय देवधर)
- डायमंड्स आर फॉरएव्हर (अनुवाद : अशोक पाथरकर)
- थंडरबॉल (अनुवाद : जयंत कर्णिक)
- द मॅन विथ द गोल्डन गन (अनुवाद : देवदत्त केतकर)
- द स्पाय हू लव्ह्ड मी (अनुवाद : अजित ठाकूर)
- फॉर युअर आईज ओन्ली (अनुवाद : अनिल काळे)
- फ्रॉम रशिया विथ लव्ह (अनुवाद : विजय देवधर)
- माय नेम इज बॉण्ड, जेम्स बाँड (अनुवाद : डाॅ. संजय कप्तान)
- मूनरेकर (अनुवाद : उदय नारकर)
- यू ओन्ली लिव्ह ट्वाईस (अनुवाद : जयवंत चुनेकर)
- लिव्ह ॲन्ड लेट डाय (अनुवाद : अनिल काळे)