आसाराम लोमटे
आसाराम लोमटे हे एक मराठी लेखक आणि पत्रकार आहेत. लोकसत्ता या दैनिक वर्तमानपत्राचे ते परभणी येथील वार्ताहर आहेत.
आसाराम लोमटे यांची ‘होरपळ’ ही कथा ‘सत्याग्रही’मध्ये १९९५ साली प्रकाशित झाल्यापासून त्यांनी ग्रामीण कथा लिहिण्याचे ठरविले. ते म्हणतात, पूर्वी ग्रामीण कथांमधील ग्रामीण भागाचे चित्रण म्हणजे त्याचे गौरवीकरण होते. झुळझुळ पाणी वगैरे अशा संकल्पना त्यात रंगविल्या जायच्या. त्यात भडकपणा आणि बटबटीतपणा होता. म्हणून ते टाळून जगण्यातला संघर्ष कसा आहे, हे सांगणारी ग्रामीण कथा लिहिण्याचे लोमट्यांनी ठरविले. लघुकथांमध्ये न अडकता आपल्याला दीर्घकथा लिहिता येऊ शकते, हे १९९५ साली कळल्यानंतर त्यांच्या लेखनप्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली
आसाराम लोमटे यांच्या आलोक आणि इडा पिडा टळो या दोन्हीही पुस्तकांमधील कथांचे कानडी, हिंदी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या पाच दीर्घ कथांचा कानडी भाषेतील अनुवाद ‘कोटेमने’ या नावाने प्रसिद्ध आहे. ‘इडा पिडा टळो’मधील ‘बेईमान’ या कथेवर ‘सरपंच भगीरथ’ हा चित्रपटही निघाला आहे. त्यांच्या साहित्यावर काही अभ्यासकांनी शोधप्रबंध सादर केले आहेत.
आसाराम लोमटे यांचे वैचारिक लेख
‘दुष्काळ झळा : निवडणुकीच्या रंगीबेरंगी सतरंजीखाली दडवलेला कचरा’ हा आसाराम लोमटे यांचा लेख २०१९ सालच्या एप्रिलमध्ये लोकसत्तेत प्रसिद्ध झाला. तेव्हा दुष्काळाच्या आणखीही वेगवेगळ्या पैलूंवर लिहावे असे त्यांच्या डोक्यात आले. हा लेख वाचूनच साप्ताहिक ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी दुष्काळावर 'साधना'चा एक पूर्ण अंकच काढला. या अंकात आसाराम लोमटे यांनी सर्वच म्हणजे आठ लेख लिहिले. हे लेख लिहिण्यापूर्वी असाराम लोमटे ह्यांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांना भेटी दिल्या. जिथून मध्य प्रदेशाची हद्द दिसते, अशा वरूड तालुक्यातल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावांपासून ते नेहमीच दुष्काळ सोसणाऱ्या माणदेशातल्या अनेक गावांपर्यंत या निमित्ताने ते फिरले.
४५-४६ अंशापर्यंत तडकलेल्या चढत्या भाजणीच्या उन्हात जगण्याचा संघर्ष करणाऱ्या,व दुष्काळ सोसणाऱ्या आणि दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या रयतेशी त्यांना संवाद साधता आला. मराठवाड्यातल्या केज, धारूर, परांडा, मंठा, भूम विदर्भातल्या अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, रिसोड, लोणार, वाशीम; माणदेशातल्या आटपाडी, खटाव, जत, माण आणि खानदेशातल्या अमळनेर, चाळीसगाव, धरणगाव, पारवा, सांगोला अशा परिसरातल्या अनेक गावांना, तांडे-वाडी-वस्त्यांना भेटी देऊन असाराम लोमट्यांनी दुष्काळाची दाहकता समजून घेतली आणि 'साधना'त हे ८ लेख लिहिले :
- छावणीला पर्याय? संपतरावाना विचारा
- जिताराबांसाठी वसलेलं गाव
- दुष्काळाचा फेरा आणि क्रियाकर्म
- पाखरावाणी लांबून चारा–पाणी आणायचं...
- पाताळात जाण्याची स्पर्धा!
- 'बनगरवाडी'तला 'दुष्काळ' तेवढा उरलाय!
- श्रीमंत गाव, घोटभर पाण्याला महाग
आसाराम लोमटे यांची ग्रंथसंपदा
- आलोक (कथासंग्रह), शब्द पब्लिकेशन
- इडा पिडा टळो (कथासंग्रह), शब्द पब्लिकेशन
- धूळपेर (लेखसंग्रह),शब्द पब्लिकेशन
पुरस्कार
- आलोक या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार (२०१६)
- महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार
- भैरू रतन दमाणी पुरस्कार
- पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार
- सह्याद्री व नवरत्न पुरस्कार
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ग.ल. ठोकळ पारितोषिक
- नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे दिला जाणारा अ.वा. वर्टी पुरस्कार
- भि.ग. रोहमारे पुरस्कार, वगैरे वगैरे.