Jump to content

आर्य समाज

टपाल तिकीट-आर्य समाज

आर्य समाज हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी १० एप्रिल, १८७५ मध्ये स्थापन केलेला एक धार्मिक पंथ आहे.

एकोणिसाव्या शतकात भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी घडून येत असताना त्यामध्ये आर्य समाजाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सामाजिक धार्मिक सुधारणा होत असताना स्वदेश स्वधर्म याविषयीच्या अस्मितेला संजीवनी देण्याचे कार्य आर्य समाजाने केले. पाश्चिमात्त्य धर्मविचार, आचार व ज्ञान हेच केवळ सर्वश्रेष्ठ नसून भारतीय संस्कृती आणि तिचे तत्त्वज्ञानही श्रेष्ठ आहे हे भारतीयांना आणि परीक्षकांना आर्य समाजाने पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते बऱ्यापैकी यशस्वी ठरले. हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीतींवर हल्ला करत असताना हिंदू धर्माला आधुनिक स्वरूपामध्ये पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न आर्य समाजाने केला; परंतु हिंदू धर्माच्या स्वरूपामध्ये होत्या त्या स्वरूपात आर्य समाजाला पुनरुज्जीवित करावयाचे नव्हते, तर हिंदू धर्मातील ज्या बाबी योग्य आहेत, त्यांना आधुनिकतेची जोड द्यावयाची होती. म्हणजेच प्राचीन योग्य परंपरांचा अभिमान आणि आधुनिकता या दोन्ही बाबी त्यांना स्वीकारायच्या होत्या, म्हणूनच त्यांनी गुरुकुल पद्धतीबरोबरच इंग्रजी शिक्षणाकडेही लक्ष दिले. भारतीय प्रबोधनाच्या चळवळीत शिक्षणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, हे त्यांनी जाणले. त्यामुळे या काळामध्ये आर्य समाज हा सर्वांत जास्त लोकप्रिय ठरला. त्याने भारतीय जनमानसामध्ये मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास आणि स्वाभिमान निर्माण केला.

स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म १२ फेब्रुवारी, १८२४ मध्ये गुजरातमधील मोरबी संस्थानातील टंकारा या गावी झाला त्यांच्यामुळे नाव मूळ शंकर तिवारी व त्यांच्या वडिलांचे नाव करसनजी लाल जी तिवारी असे होते. लहानपणापासूनच त्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले होते त्यांचे घराणे हे शिव उपासक म्हणून ओळखले जात असे चौदाव्या वर्षी दयानंद यांच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग घडला महाशिवरात्रीला काठियावाड मध्ये मोठा उत्सव भरत असे यावेळी ते आपल्या वडिलांबरोबर शिवाची पूजा करत होते रात्रीच्या वेळेस त्यांच्या असं निदर्शनास आलंय की महादेवाच्या पिंडी वरील प्रसाद उंदीर खात आहेत यावरून त्यांच्या लक्षात आलं की मुर्ती मुर्ती पूजेमध्ये सामर्थ्य नाही यानंतर काही प्रसंग घडली त्यामुळे मूर्तिपूजावरील त्यांचा विश्वास उडाला आणि त्यांनी १८४५ मध्ये गृहत्याग केला. सत्य ज्ञान व धर्माच्या शोधासाठी त्यांनी भ्रमंती केली. त्यानंतर त्यांनी मथुरा या ठिकाणी आद्य पंडित विरज आनंद यांचे शिष्यत्व पत्करले. त्यांच्याकडून त्यांना हिंदू धर्मातील तारतम्य भावाचे ज्ञान प्राप्त झाले सरस्वती संप्रदायाची त्यांनी दीक्षा घेतली आणि ते स्वामी दयानंद सरस्वती म्हणून ओळखले जाऊ लागले. यानंतर दयानंदांनी देशभर प्रवचने करत प्रवास केला १८६९ मध्ये त्यांनी काशीच्या ब्राह्मणांबरोबर शास्त्रार्थवर वादविवाद केला. यानंतर दयानंदांनी वैदिक धर्माचा प्रसार करण्याचे ठरवले आणि यातून त्यांनी १८७४ला सत्यार्थप्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला. यामध्ये आर्य समाजाची वैचारिक तत्त्वे त्यांनी मांडली आहेत. त्यांनी मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली आणि १८७७ मध्ये आर्य समाजाच्या घटनेला मूळ स्वरूप देण्यात आले. यानंतर लाहोर हेच आर्य समाजाचे प्रमुख केंद्र बनले.

परमेश्वर हा सच्चिदानंदस्वरूप असून तो अनादी, अनंत, निराकार, सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान व दयाळू आहे. तोच सर्व विश्वाचा निर्माता व पालनकर्ता आहे, असे आर्य समाज मानतो..

परमेश्वर सत्य ज्ञानाचे मूळ आहे. आदी व अंतही परमेश्वरच आहे. पृथ्वीवरील सर्व वस्तू त्याच्या स्वरूपातीलच आहेत, अशी आर्य समाजाची भावना आहे. आर्य समाजाने मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारला परमेश्वराचे अस्तित्व हे मूर्तिपूजेमध्ये नाही, हे सत्य मांडण्याचा प्रयत्न आर्य समाजाने केला. वास्तववादी दृष्टिकोनातून समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य आर्य समाजाने केले. आर्य समाजाने तात्त्विक भूमिका मांडताना सर्व ज्ञानाचा उगम हा परमेश्वर आहे, असे म्हणले. त्याचप्रमाणे परमेश्वर हा सर्व विश्वाचा निर्माता व पालक आहे आणि तो अनादि-अनंत निराकार व सर्वसाक्षी आहे. वेद ईश्वरापासून निर्माण झाले आहेत आणि त्याचे अध्ययन व अध्यापन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे म्हणले. प्रत्येकाने असत्याचा त्याग करून सत्याचा स्वीकार करावा. प्रत्येक कर्म करताना नीतिनियम व चांगल्या-वाईटाचा विचार करावा आणि जे योग्य आहे, ते स्वीकारावे मानव जातीच्या उन्नतीचा व सर्वांगीण कल्याणाचा सर्वांनी विचार करावा. प्रत्येकाची वर्तणूक ही प्रेम, न्याय व वैयक्तिक सदगुणांवर आधारित असावी. प्रत्येकाने स्वतःच्या प्रगतीऐवजी इतरांच्या प्रगतीत आपलीदेखील प्रगती आहे असे मानावे. एकूणच आर्यसमाजाच्या तत्त्वज्ञानात आपल्याला पुनरुज्जीवन, आधुनिकता व नैतिकता या बाबी दिसतात. आर्य समाजाचे या काळातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आर्य समाजाने चालवलेली शुद्धीकरण चळवळ ही होय. शुद्धीकरण चळवळीच्या माध्यमातून हिंदू धर्मातून इतर धर्मामध्ये प्रवेश केलेल्या स्वकीयांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेण्याचा प्रयत्न शुद्धीकरण चळवळीच्या माध्यमातून आर्य समाजाने केला. अनेक हिंदूंना पुन्हा धर्मामध्ये घेण्याचं कार्य आर्य समाजाने दाखवलं आणि यातून एकूणच धर्माचे संरक्षण केले. त्याचप्रमाणे स्वदेशी या शब्दाला आर्य समाजाने सुरुवातीपासूनच महत्त्व दिले. आपण आपल्या देशातच तयार होणाऱ्या वस्तू आपल्या पाहिजेत: कारण यामुळे आपला पैसा बाहेर जाणार नाही हे आर्य समाजाने स्पष्ट केले. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा यामागे खरा दृष्टिकोन होता. शासनाविषयी आर्य समाजाचे मत असे होते की चांगल्यातल्या चांगल्या परकीय शासना पेक्षा वाईटातील वाईट स्वदेशी शासन केव्हाही चांगले; कारण ते आपले असते. प्रबोधन काळामध्ये हे आर्य समाजाने सामान्य लोकांच्या प्रश्नांना हात घातला. धर्म स्थापनेच्या संदर्भामध्ये नवविचार पुरस्कृत केला. नवीन दृष्टिकोन लोकांसमोर मांडला. यामुळे या काळात आर्य समाजाला मोठी लोकप्रियता मिळाली. शुद्धीकरण चळवळ राबवून यामध्ये आर्य समाजाने पुढाकार घेतला, यामुळे इतर धर्माकडे आकर्षित होणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी झालं, किंबहुना इतर धर्मामध्ये गेलेल्या लोकांनी पुन्हा आपल्या धर्माचा स्वीकार केला. आर्य समाजाने सुरू केलेल्या या शुद्धीकरण चळवळीमुळे परिवर्तनाला एक वेगळी गती मिळाली. सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने टाकलेले ते एक महत्त्वाचे पाऊल होते.