Jump to content

आयोनियन तत्त्वज्ञान

आयोनियन किंवा मायलेशियन तत्त्वज्ञान प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानाचा प्रारंभ आयोनियन, अर्थात मायलेशियन तत्त्वज्ञानापासून होतो. इ.स.पूर्व सातव्या शतकात प्राचीन ग्रीसमधील आयोनिआ या प्रांतामधील काही विचारवंतांनी तात्त्विक विचारांचा प्रारंभ केला. त्यांनी जे तत्त्वज्ञान मांडले, त्याला आयोनियन तत्त्वज्ञान असे म्हणतात. आयोनिआ प्रांतातील मायलेशिया किंवा मायलेटस् या नावाच्या गावाचे ते विचारवंत रहिवासी असल्याने त्यांच्या तत्त्वज्ञानाला मायलेशियन तत्त्वज्ञान असेही म्हणतात. ग्रीक तात्त्विक विचारांचा प्रारंभ मायलेशियन तत्त्वज्ञानापासून होतो. ग्रीक तत्त्वज्ञानातील विश्वकेंद्री विचाराचा प्रवाह आयोनियन तत्त्वज्ञानापासूनच सुरू होतो. तसेच ग्रीक तत्त्वज्ञानामध्ये निसर्गाचा अभ्यास करण्याची जी परंपरा दिसते, तिचाही प्रारंभ या तत्त्वज्ञानात दिसून येते. या दृष्टीने आयोनियन विचाराच्या अभ्यासाला महत्त्व आहे.