आयुर्वेदातील त्रिदोष
"आयुषः सम्बन्धी वेदः आयुर्वेदः" अशी आयुर्वेदाची व्याख्या आचार्य वाग्भट यांनी आपल्या "अष्टाङ्गहृदयं" य ग्रन्थत केली आहे. आयुर्वेदाचे मुख्य प्रयोजन आहे, जो स्वस्थ असेल त्याच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि रोग्याची रोगापासून मुक्तता करणे. यात मुख्य प्रश्न असा कि जो स्वस्थ आहे, त्याला हे रोग येतात कुठून? जर कारणच नाहीसं झालं तर रोग होणारच नाहीत. य सर्व रोगांचे मूळ कारण म्हणजे वात, पित्त आणि कफ या तिघांचा असमतोल. म्हणून यांना त्रिदोष असेही म्हणतात. ‘दूषयन्तीति दोषाः।’ शरीरात वात, कफ व पित्त या तिन्हीत असंतुलन निर्माण झाल्यास हे शरीरास दूषित करतात, म्हणून यांना दोष म्हणतात. हे तीन दोष समस्त शरीरात व्याप्त असतात तरीसुद्धा नाभि आणि हदयाच्या मध्ये पित्त आणि हदयाच्या वरती कफाचे स्थान आहे. म्हातारपणी वायु प्रकोप अधिक असतो. युवावस्था मध्ये पित्तचा प्रकोप अधिक असतो. तर बालपणी कफाचा प्रकोप अधिक असतो .
वात
‘तत्र रूक्षो लघुः शीतः खरः सूक्ष्मश्चलोsनिलः’[१]
वात हा कोरडा, शरीराला लाघवता आणणारा, थंड, आणि सूक्ष्म असतो. शरीरात वाताचे स्थान विशेषतः नाभी खाली असते. वृद्धपणात वातप्रकोप होण्याची संभावना अधिक असते. वात प्रकोपामुळे अग्नि विषम होतो. तर कोष्ठ क्रुर होते. तिक्त, कटू व तुरट रसांच्या सेवनाने शरीरात वात प्रकोप होतो आणि मधुर, आम्ल व लवण रससेवनाने त्याचे शमन होते.वात प्रकोपावर ‘बस्ति’ हे शोधन कर्म आणि तैलांचा औषधी म्हणून प्रयोग आयुर्वेदात सांगिलेले आहे. प्राण, उदान, समान, व्यान, अपान हे वाताचे पाच प्रकार आहेत.
पित्त
‘पित्तं सस्नेहतीक्ष्णोष्णं लघु विस्रं सरं द्रवम।’
स्निग्ध, उष्ण, लघु, दुर्गंधी, आणि ओलेपणा हे पित्ताचे स्वभाव गुण आहेत. नाभी भागापासुन ह्रुदयापर्यंत पित्ताचे अधिष्ठान असते. पित्ताच्या प्रभावामुळे जठराग्नी तीक्ष्ण होतो, तर कोष्ठ मृदू होते. वयाच्या मध्य काळात पित्ताचा अधिक प्रभाव दिसतो. तिखट, आम्ल, लवण, रसांच्या अतिसेवनाने पित्ताचा प्रकोप तर मधुर, कडू व कषाय रससेवनाने पित्ताचे शमन होते. तसेच आयुर्वेदात पित्तशमनासाठी ‘विरेचन’ कर्म आणि ‘घृत’ प्रयोग निर्देशित केलेला आहे. आलोचक, रंजक, भ्राजक, पाचक, व साधक असे पाच प्रकारचे पित्त आहेत.
कफ
‘स्निग्धः शीतो गुरूर्मन्दः श्लक्ष्णो मृत्स्नः स्थिरः कफः।'
कफ हा स्निग्ध, शीत, जड, मन्द, चिकट, आणि स्थिर प्रकृतीचा असतो. हा बाल्यावस्थेत विशेष प्रभावशाली असतो. ह्रुदयापासून वरच्या भागात कफाचे प्राबल्य असते. याच्या प्रभावाने जठराग्नी मंदावतो आणि कोष्ठ मध्यम होते. मधुर, लवण, आम्ल हे रस कफवृद्धी करतात तर तिक्त, कटू व कषाय रस कफाचे शमन करतात. मधू सेवन आणि ‘वमन’ कर्माद्वारे कफाचे शमन शास्त्रात सांगितलेले आहे. अवलंबक, बोधक, तर्पक, क्लेदक आणि श्लेषक हे पाच कफाचे भेद मानले जातात.
वरीलपैकि एक अथवा दोन दोष प्रबळ असलेली शरीर प्रकृती हीन असते, तर तिन्ही दोष सम असणारे शरीर प्रकृतीने स्वस्थ बनते, त्यामुळे निरोगी राहाण्यासाठी त्रिदोषांचे साम्य राखण्याचा प्रयत्न करणे लाभदायक ठरते.
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ अष्टांगह्रदयम्.