आमचा बाप आन् आम्ही
आमचा बाप आन् आम्ही | |
लेखक | डॉ. नरेंद्र जाधव |
भाषा | मराठी |
देश | भारत |
प्रकाशन संस्था | ग्रंथाली |
प्रथमावृत्ती | २ डिसेंबर १९९३[१] |
चालू आवृत्ती | २०१वी (जानेवारी २०२१ नुसार) |
पृष्ठसंख्या | २९९ |
पुरस्कार | साहित्य अकादमी पुरस्कार (पंजाबी भाषा) |
आमचा बाप आन् आम्ही हे डॉ. नरेंद्र जाधव यांनी इ.स. १९९३ लिहिलेले आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे.[२] यात आंबेडकरी चळवळीतून प्रेरणा घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून गेलेल्या जाधव कुटुंबीयांच्या संघर्षाची कहाणी आहे. या पुस्तकात चार पिढीची कथा आहे. जानेवारी २०२१ मध्ये, या पुस्तकाची २०१वी मराठी आवृत्त्या निघालेली असून हे मराठी साहित्याच्या इतिहासातील आजवरचे सर्वात मोठ्या विक्रीचे पुस्तक आहे.
अर्पण पत्रिका
डॉ. जाधव पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत लिहितात की,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अस्मिता जागृत झालेल्या एका कुटुंबाची ही कहाणी.
आमच्या आई-वडिलांनी आम्हाला जन्म दिला असला तरी माणूस म्हणून, त्यांना व आम्हाला जगण्याचा हक्क मिळवून दिला तो सर्वस्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि म्हणूनच तर या यशोगाथेचे मूकनायक आहेत ते, व्यापक अर्थाने आम्हा सर्वांचे ‘बाप’ असलेले परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये
डॉ. नीलिमा गुंडी यांच्या मतानुसार नाशिकजवळील बोलीभाषा, प्रसन्न शैली, आशावादी जीवनदृष्टी ही या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.[२]
आवृत्त्या
जानेवारी २०२१ पर्यंत, या पुस्तकाच्या २०१ मराठी आवृत्त्या निघालेल्या आहेत व मराठी साहित्याच्या इतिहासात सर्वात मोठ्या विक्रीचे पुस्तक म्हणून याची नोंद झालेली आहे. हे पुस्तक मराठी, इंग्लिश, हिंदी, गुजराती, कन्नड, तामिळ, उर्दू, कोंकणी आणि पंजाबी ('साहित्य अकादमी पुरस्कार' प्राप्त), फ्रेंच, स्पॅनिश अशा एकूण २० देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे. कोरियन, फ्रेंच आणि थाई भाषांमध्ये हे पुस्तक बेस्टसेलर आहे. कोरीयन भाषेत निघालेल्या या पुस्तकाच्या आवृत्या ३०० पेक्षाही अधिक आहेत.
अभिप्राय
- कुसुमाग्रज: “हि कथा आहे सामान्यातील एका असामान्याची... प्रगतीसाठी मुलांना सतत प्रेरणा देणाऱ्या, त्यांची मने घडवणाऱ्या, मीपणाच्या बाह्यांगापासून दूर असलेल्या आणि तरीही खूप मोठ्या असलेलेल्या बापाची.”
- निळू फुले: “साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि नरेंद्र जाधवांनी महाराष्ट्राला दिला आदर्श बाप!”
- पु.ल. देशपांडे: “ज्ञान, निर्भयता आणि संघर्ष या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंत्राचा उच्चार सतत होत असतो, पण हा विचार पचवून कृतीत आणणारा जो माणूस या पुस्तकात ‘बाप’ म्हणून भेटला त्याला कडकडून मिठी मारावी असे वाटते. आम्हा सर्व साहित्यिकांचा तो बापच आहे!”
- वसंत बापट: “मराठी भाषेच्या सात-आठशे वर्षांच्या इतिहासातील सर्वोत्तम (All time best) अशा पहिल्या पाच ग्रंथांमध्ये मी या पुस्तकाचा समावेश करीन. हे पुस्तक म्हणजे मराठी भाषेचे अक्षरलेणे आहे.”
- वसंत बापट: “घराघराच्या छतावर उभे राहून, साऱ्या जगाला ओरडून सांगावेसे वाटते; हे पुस्तक वाचा.”
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4621807754516362059
- ^ a b "आत्मचरित्र : १९९१-२०१० - डॉ. नीलिमा गुंडी". uniquefeatures.in (इंग्रजी भाषेत). 2015-03-10. 2018-03-19 रोजी पाहिले.