आनंद बालाजी देशपांडे
आनंद बालाजी देशपांडे |
---|
आकाशानंद ऊर्फ आनंद बालाजी देशपांडे (१९३४ - १३ मार्च, २०१४:मुंबई) हे मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी उपसंचालक होते. इ.स. १९७२ साली मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू होण्याआधी आकाशानंद नागपूर नभोवाणी केंद्रात होते. मूळ कार्यक्रम निर्माते असलेले आकाशानंद, आपल्या १९७२ ते १९९२ पर्यंतच्या सेवाकाळात मुंबई दूरदर्शन केंद्राच्या उपसंचालक पदापर्यंत पोहोचले होते.[ संदर्भ हवा ]
मुंबईत आल्यावर आकाशानंद यांनी ’ऐसी अक्षरे’ आणि शालेय चित्रवाणी’ या कार्यक्रमांची निर्मिती केली.त्यानंतर त्यांनी शिक्षण, समाजसेवा आदी क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणारा ’ज्ञानदीप’ हा कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली.[१]
मुंबई दूरदर्शनवरचा हा कार्यक्रम इतका लोकप्रिय झाला की, 'ज्ञानदीप' या कार्यक्रमामार्फत ज्ञानाची ज्योत घराघरात पोचली. या कार्यक्रमावर आधारित 'ज्योत एक सेवेची' हे मासिकही आकाशानंद यांनी त्यांनी पंचवीस वर्षे चालवले.[२]
इ.स. १९९२ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर आकाशानंद यांनी अंधेरीत पहिल्या 'ज्ञानदीप' मंडळाची स्थापना केली. त्याचा विस्तार होऊन राज्यात पंधराशे मंडळे स्थापन झाली. 'ज्ञानदीप' या कार्यक्रमावर अमिता भिडे यांनी पीएचडी मिळवली, पण त्याही आधी १९८८ मध्ये या कार्यक्रमाची दखल घेऊन त्यावर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या एलिझाबेथ स्मिथ यांनी पंचेचाळीस मिनिटांचा लघुपट केला होता.[३]
नागपूर रामनगर येथे केलेले उपक्रम[२]
- आजोबांचे आशीर्वाद या सिरीजचे उद्घाटन. या सिरीजचा उद्देश:- त्या काळामध्ये, (१९६०) साली जे लहान मुलं होते (१० वर्ष अंतर्गत) त्यांना त्या काळातले सगळी थोर मंडळी कशी पाहायला मिळणार? यासाठी या सिरीज मध्ये, आबांनी त्या काळातील निवृत्त स्वातंत्र्य सैनिकांना त्यांच्या घरी बोलावून घेतले आणि साधा सरळ कार्यक्रम राहायचा. अंगणामध्ये सतरंज्या टाकून सगळी लहान मुलं बसायची.सगळे छान कपडे घालून यायची. एकूण ४०-५० मुलं असायची. त्यातल्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला हातामध्ये गुलाबाचे फुल द्यायचे. मुख्य प्रमुख पाहुण्यांना लहान मुलांच्या मध्ये खुर्चीवर बसवलं जायचं आणि त्या लहान मुलाने त्यांना नमस्कार करायचा आणि म्हणायचं,"आजोबा, तुम्ही मोठे कसे झालात हे सांगा आम्हाला"[४] मग सगळी थोर मंडळी त्यांची लाईफ स्टोरी सांगत. लहान मुलांमध्ये या गोड आठवणी रहाव्यात म्हणून ही सिरीज सुरू करण्यात आली. या सिरीज मध्ये अनेक थोर व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले. ज्यात लोकनायक बापूजी अणे, फिल्म इंडस्ट्रीतील प्रख्यात कलाकार बापूराव पेंढारकर, यशवंत खुशाल देशपांडे इत्यादींचा समावेश होता.
- वरळी मधल्या टीव्ही सेंटर मध्ये वेटिंग रूम मध्ये 'वैदर्भी' नावाचा कवितासंग्रह देशपांडे यांनी ठेवला होता. या कवितासंग्रहामध्ये विदर्भातील कवींच्या कविता होत्या. लोकं तिथे येत आणि आवडलेल्या कविता उतरवून घेत. विदर्भातले जेवढी नामवंत लोक होती त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेली कलाकारी, त्यांचे कर्तृत्व या काव्यसंग्रहातून दिसायचे. या काव्यसंग्रहातून, कवी 'श्रीधर शनवारे' यांचं काव्य लोकांना प्रचंड आवडले. त्यांचं काव्य सादर करण्याकरिता कवींना २६ जानेवारीला दिल्लीला काव्यवाचनाकरिता बोलवण्यात आले.[ संदर्भ हवा ]
- यवतमाळ येथे, मायादेवी भालचंद्र यांनी बालक नावाचं मासिक काढलं होतं. त्यांनी ते मासिक आकाशानंद यांना पुढे चालवायला सांगितले. जसे त्यांनी काढलेली अनेक मासिके ते स्वतः पाठवीत तसे बालक हे मासिक सुद्धा पाठवीत असत.[४]
लेखन
देशपांडे यांनी 'माध्यम चित्रवाणी' नावाने ’दूरचित्रवाणी’ या विषयावर पहिले मराठी पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाला राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय गोष्टींची तीनशे पुस्तके लिहून त्यांनी मराठी बालसाहित्यात मोलाची भर घातली.[४]
आकाशानंद यांनी लिहिलेली पुस्तके[२]
- टेक वन् टेक टू
- मर्मबंधातली ठेव ही
- माध्यम आकाशवाणी
- सोहनपुरी
- हिरवी शाई
आकाशानंद यांचे बालसाहित्य[२]
- असे होते गांधीजी
- इथे टिकले श्रीराम
- इंद्रधनू
- ओली माती फिरते चाक
- कर्णफुले
- कल्पना कुमारी
- किस्से परदेशी
- टुकटुक माकड
- दिलदार दरवडेखोर
- पाताळनगरी
- पुत्र व्हावा ऐसा गुंडा
- पुष्पमहाल
- मंगला
- रामटेक
- विजयादशमी
- सावल्या देणारे वृक्ष
- सूर्यफुले, वगैरे वगैरे.
- 'आजोबांचे आशीर्वाद' या सिरीजचे उद्घाटन.
आकाशानंद यांना मिळालेले पुरस्कार[४]
- गोंदियाभू्षण पुरस्कार
- महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार
- सेवाश्री पुरस्कार
संदर्भ
- ^ "आकाशानंद यांचे निधन". महाराष्ट्र टाइम्स. १३ जून २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b c d "ज्ञानदीपकार आनंद देशपांडे ऊर्फ आकाशानंद – Marathisrushti Articles". www.marathisrushti.com. marathi srushti. 9 July 2022 रोजी पाहिले.
- ^ "ज्ञानदीप". विकिपीडिया. wikipedia. 22 March 2022. 9 July 2022 रोजी पाहिले.
- ^ a b c d "आनंद देशपांडे ऊर्फ आकाशानंद – profiles". marathi srushti. 9 July 2022 रोजी पाहिले.