आनंद पाटील
प्रस्तावना
आनंद बळवंत पाटील हे आशियातील एक आघाडीचे सांस्कृतिक, तुलनाकार, ग्रामीण (मराठी-इंग्रजी) लेखक त्यांचा निर्भीडपणा व त्यांच्या अफाट आंतरवविद्याशाखीय व्यासंगामुळे ओळखले जातात. वैचारिक, ललित, प्रवासवर्णन, कथा, नाटक इत्यादी सर्व पद्धतीचे लेखन करून त्यांनी मराठी, ग्रामीण व इंग्रजी साहित्यात मोलाची भर घातली आहे. 'कागूद' आणि 'सावली' या त्यांच्या दोन लघुकादंबऱ्या फार गाजल्या.
बालपण व शिक्षण
आनंद पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले प्राथमिक व हायस्कूलचे शिक्षण सन १९५५मध्ये पूर्ण केले. हायस्कूलला जाण्यासाठी त्यांना पाच मैलाचा प्रवास पायी करावा लागत असे. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेत त्यांनी एम एचे शिक्षण सातारला १९६९ मध्ये पूर्ण केले. आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी "कमवा व शिका" योजनेचा आधार त्यांनी घेतला. पुढे त्यांना शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली. याच काळात त्यांना ब्रिटिश कौसिलची व्हिजिटरशिपहि मिळाली. शिवाजी विद्यापीठाने तौलनिक प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. प्रदान केली. हा प्रबंध पुढे इंग्रजीत प्रसिद्ध झाला.
व्यवसाय
रयत शिक्षण संस्थेच्या कराड, कोल्हापूर, रामानंदनगर, सातारा, मंचर, विटा येथील कॉलेजांत १९६९ ते १९८९ या काळात इंग्रजी विषयाचे अध्यापक म्हणून ते काम करीत. ते पुढे कोपार्डे येथील स. ब. खाडे कॉलेजचे १९९० मध्यै प्राचार्य झाले. त्यानंतर १९९१ ते २००३ मध्ये गोवा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे ते प्रपाठक होते.नवी मुंबईतील नेरूळ येथील स्टरलिंग कॉलेजचे ते २००३-०४ दरम्यान संचालक व प्राचार्य होते. सेवानिवृत्तीनंतरच्या काळात ते नवी दिल्ली विद्यापीठ, उत्तर गुजरात विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ या विद्यापीठांचे अभ्यागत प्राध्यापक होते.
रयत शिक्षण संस्थेच्या रयत शिक्षण पत्रिकेचे व कॉलेज नियतकालिकांचे तसेच गौरवग्रंथाचे ते संपादक असत.
साहित्य निर्मिती
लघुकथा, कादंबरी,वैचारिक लेखन, प्रवास वर्णन अशा विविध साहित्य प्रकारांत आनंद पाटील यांनी मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती केली आहे.
'कागूद' कथा आणि कादंबरी
प्रसिद्ध नियतकालिक सत्यकथामध्ये १९७१ साली पाटील यांची ‘कागूद’ ही लघुकथा प्रसिद्ध झाली. ती इतकी गाजली की पुढे पाटील यांना ‘कागूद’वाले लेखक म्हणून ओळखले जाऊ लागले. ह्या कथेनंतर त्यांनी त्याच नावाची ‘कागूद' ही पहिली कादंबरी (१९८२) लिहिली. खेड्यातील कॉलेजमध्ये इंग्रजीचे अध्यापन करीत असताना त्यांची कागूद ही लघुकादंबरी मौज दिवाळी (१९८२) मध्ये प्रकाशित झाली. कॉलेजात तिसऱ्या वर्षी "कमवा व शिका" योजनेत शिक्षण घेणारा मराठा शेतकरी गरीब कुटुंबातील हा तरुण भ्रष्ट व्यवस्थेच्या चक्रव्यूहात अडकतो. चाळीस वर्षे कसत असलेला शेताचा तुकडा खरेदी करण्याचा अनुभव ग्रामीण कादंबरीला वेगळे वळण देणारा ठरला. दत्ता सामंतांनी मुंबईत मोठा गिरणी कामगार संप केल्यानंतर निमकोकणातील एका कामगाराने घर बांधायला काढले. त्यानंतर संपाने समाजाची घडी बिघडवली. घोडीबा भाऊबंदकीला तोंड देत घर बांधण्याच्या चरकात अडकत जातो. हा सर्व काळ कादंबरीत प्रभावीपणे उलगडला आहे. गिरणी कामगारांच्या जीवनावरील ही पहिली लघुकादंबरी ठरली. शंकर पाटलांनी यांनी अनंद पाटील यांना "उगवता सूर्य" म्हणले.
'कागूद'च्या यशानंतर
पाटलांनी इच्छामरण (२००८) ही कादंबरी शतायुषी आजीवर जवळ जवळ ४० कथानके जुळवत लिहिली. अखंड खेडे डोल्यासमोर उभे करणारी मराठीतील ही पहिली ग्रामीण कादंबरी साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केली. पाच भाषांतली आणि उत्तराधुनिक तंत्रातील ही पहिली कादंबरी काळाच्या आधी जन्मली. तिला पुणे नगर वाचन मंदिरचा श्री.ज. जोशी पुरस्कार मिळाला.
आंतरराष्ट्रीय पातळीवर योगदान
युरोप (१९८६), बांगला देश (१९९१), अमेरिका (१९९६), चीन (२००१), हॉलंड (२००२), बँकॉक (२००३), द. कोरिया (२००४) आणि भारतभर व्याख्याने यामुळे सांस्कृतिक तुलनाकार लेखक ही पाटलांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार झाली. त्याचे प्रत्यंतर ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठांच्या प्रकाशनांमधील त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या लेखांमधून येते. त्यांच्या इंग्रजी लिखाणाचा अंतर्भाव भारतीय विद्यापीठांनी आठ पुस्तकांमध्ये समाविष्ट केला.
कथा-कादंबऱ्यांशिवाय पाटलांनी मराठीत दोन व इंग्रजीत एक अशी प्रवास लेखने प्रसिद्ध केली आहेत. त्यांतली 'पाटलाची लंडनवारी' हिंदी व कन्नड मध्ये अनुवादित झाली. ते मार्जिनल माणसाचे पहिले भारतीय प्रवास लेखक म्हणून मान्यता पावले. कोल्हापूर जिल्ह्यावरचे इंग्रजी प्रवास लेखन हा भारतातील पहिलाच प्रयोग ठरला आहे. तौलनिक साहित्य व संस्कृती अभ्यासातील मराठीत एक डझन व इंग्रजीमधील अर्धा डझन ग्रंथ लिहून त्यांनी नवा इतिहास घडवला आहे. मराठीत त्यांच्या 'महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी" ने बेस्ट सेलरचा मान मिळवून अपूर्व विक्रम केला आहे. आंतरविद्याशाखीय तुलनात्मक सांस्कृतिक अभ्यासाचा आद्य प्रवर्तक म्हणून महाराष्ट्राचा 'रेमण्ड विल्यम्स' हे त्यांचे स्थान अढळ आहे.
पाटलांचा प्रतिकारक सौंदर्यवाद, तुलनावाद आणि सांस्कृतिक विज्ञानवाद
सातत्याने परंपरानिष्ट आस्वादक समीक्षेचे वस्त्रहरण, मराठी नाटकावरील पाश्चात्त्य प्रभाव (१८१८-१९४७), समग्र बा. सी.मर्ढेकर : तौलनिक सांस्कृतिक मीमांसा, समग्र शेक्सपिअर : तुलनात्मक सांस्कृतिक समीक्षा, ग्रंथानी रचलेला महापुरुष : यशवंतराव चव्हाण असे दोन डझनपेक्षा जास्त इंग्रजी - मराठी ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.
याचबरोबर संधीसाधू देशीवाद, अनीतिवाद, वाङ्मय व संस्कृतीमधील टोळीबाज यावर नव्या संकल्पना व सिद्धान्त वापरून निर्भयपणे प्रहार केले. रा.रं. बोराडे त्यांना सैन्य नसलेला सेनापती म्हणतात. त्यांचे तौलनिक शोधनिबंध अमेरिका, इंग्लंड व कॅनडामध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे गोव्यातील लॅम्बर्ट मस्करेन्हसची 'साॅरोइंग लाईज माय लॅंड' अमेरिकेतील तौलनिक सांस्कृतिक अभ्यासक्रमात नेमली गेली, त्यांचा इंग्रजी - मराठीत प्रसिद्ध झालेला प्रबंध आणि ब्रिटिश बॉम्बे आणि पोर्तुगीज गोव्यातील वाड्मय असे ग्रंथ संदर्भासाठी जगभर वापरले जात आहेत. त्याचबरोबर डॉ. पंजाबराव देशमुखांचा ऑक्सफर्ड विद्यापीठाने १९३३ साली छापलेला आणि ब्रिटनच्या वाङ्मयीन वारसा म्हणून आठ लाख ग्रंथात समावेश असलेला ‘द ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ रिलिजन इन वेदिक लिटरेचर’चा मराठीत अनुवाद व संपादन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
प्रकाशित पुस्तके
डॉ. आनंद पाटील यांच्या प्रकाशित पुस्तकांची यादी :
कादंबरी
- इच्छामरण : साकेत प्रकाशन (औरंगाबाद) (२००८)
- कणसं आणि कडबा
- कागूद आणि सावली : दोन लघुकादंबऱ्या. मुंबई, मौज प्रकाशन (१९८६).
कथा संग्रह
- खंडणी. : पुणे : स्नेहबंध (पुणे) (२०११)
- दावण : साहित्यसेवा प्रकाशन (औरंगाबाद) (१९९८)
- फुगडया : (१९९४)
- फेरा (२००६)
- शोध एका चळवळ्या मित्राचा : (२०१०)
- सुपर्ण वृक्षाखाली भर दुपारी : (२००६, दुसरी आवृत्ती - २०११)
प्रवास लेखन
- परदेशी सहा परिक्रमा : सुविद्या प्रकाशन (पुणे )(२००३) (हिंदीतही अनुवाद)
- पाटलाची लंडनवारी. लोकवाङ्मय-मुंबई (१९९९) (कन्नड भाषेतही अनुवाद)
तौलनिक साहित्य
- आनंदपर्व : तौलनिक साहित्य आणि सांस्कृतिक समीक्षा - आनंद ग्रंथसागर -कोल्हापूर
- काही लोकल काही ग्लोबल, आनंद ग्रंथसागर -कोल्हापूर : (२०१९)
- तुळव : तौलनिक निबंध. ग्रंथाली (२००२) ग्रंथाली-मुंबई (२००२)
- तौलनिक साहित्य : नवे सिद्धांत आणि उपयोजन : साकेत प्रकाशन- औरंगाबाद (१९९८)
- ब्रिटिश बॉम्बे आणि पोर्तुगीत गोव्यातील वाङ्मय, ग्रंथाली -मुंबई(१९९८)
- मराठी नाटकांवरील इंग्रजी प्रभाव, : लोकवाड्मय-मुंबई (१९९३)
- साहित्य काही देशी काही विदेशी : पद्मगंधा (पुणे) (२००४)
चरित्रे
- ग्रंथानी रचलेला महापुरुष : यशवंतराव चव्हाण : आनंद ग्रंथसागर (कोल्हापूर) (२०१७)
- महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी : आनंद ग्रंथसागर (कोल्हापूर) २०१८
- सह्याद्री
तुलनात्मक सांस्कृतिक समीक्षा
- तरवा : (२००५)
- टीकावस्त्रहरण : आकांक्षा (नागपूर) (२००८)
- ब्रिटिश बॉंबे आणि पोर्तुगीज गोव्यातील वाङमय
- समग्र बा.सी. मर्ढेकर : तौलनिक सांस्कृतिक समीक्षा (२०१८) पद्मगंधा (पुणे ) (२०१८)
- समग्र शेक्सपिअर : तौलनिक सांस्कृतिक समीक्षा : आनंद ग्रंथ सागर (कोल्हापूर) (२०१७)
- समीक्षा अपहरण, औरंगाबाद : रजत, (२०१०)
- साहित्य विमर्श मरणम् : डायमंड (पुणे) (२०११)
- सृजनात्मक लेखन
अनुवाद
- उरूस बसवराज नायकरांच्या द लाईट इनर हाऊस : दत्त प्रकाशन (पुणे) (२००६)
- धर्माचा वैदिक वाङ्मयातील उदय आणि विकास डॉ.पंजाबराव देशमुख - प्रबंध (२००५) : आनंद ग्रंथसागर (कोल्हापूर)
इतर
सृजनात्मक लेखन : पद्मगंधा-पुणे (२००५)
नाटक
संगीत ऑटोमॅटिक आसूड : आनंद ग्रंथसागर-कोल्हापूर (२०१८)
इंग्रजी ग्रंथ
- इन सर्च ऑफ माय कोल्हापूर श्रुट्रूकलर्स आईज (२०११) (??????)
- उद्धव शेळके : मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर (२००२)
- परस्पेक्टिव्ह्ज ॲन्ड प्रोग्रेशन : ॲक्सेस इन कंम्परिटिव्ह लिटरेचर (२००५)
- रिव्हिजनिंग कम्पॅरिटिव्ह लिटरेचर ॲन्ड कल्चर (२०११)
- लिटररी इनटू कम्पॅरिटिव्ह लिटरेचर ॲन्ड कल्चरल क्रिटिसिझम (२०११)
- वेस्टर्न इन्फ्लुअन्स ऑन मराठी ड्रामा (१९९३)
- द व्हर्लिगिग ऑफ टेस्ट : एक्सेज इन कम्पॅरिटिव्ह लिटरेचर (१९९९)
आनंद पाटील यांची परखड मते व भूमिका
मराठी नाटकांवरील पाश्चात्त्व प्रभाव या विषयाच्या पन्नास वर्षांच्या सखोल व्यासंगामुळे उत्तम "हेर" तुलनाकार आणि सांस्कृतिक मीमांसक म्हणून आनंद पाटील प्रसिद्ध आहेत. मराठी साहित्य व संस्कृतीमधील "फेकाफेकी" चव्हाट्यावर मांडल्यामुळे त्यांना "दहशतवादी" देखील म्हणले जाते. ते महाराष्ट्राचे "भूषण" ठरलेले लेखक "उचले" दूषण ठरवतात. दिल्लीच्या साहित्य अकादमीच्या मंचावरून भारताला जातवर्ण आधारित सांस्कृतिक व तुलनात्मक समीक्षेची त्यांनी गरज प्रतिपान केली. सुलभीकरण आणि पुराणीकरणाचा शाप संकल्पना आणि सिद्धांताना प्रतिपादक आहे. समग्र आधुनिक भारतीय साहित्य युरोमेरिका केंद्रीय आहे. पश्चिमी विषारीकरण व श्रेणीबद्ध समाजात पाझरणारे श्रेष्ठत्वाचे विष यांचे सप्रमाण विवेचन करणारा हा पहिला निर्भय सांस्कृतिक तुलनाकार आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता आहे.
रात्री सनातनी संघीसाधू देशीवादी, उन्नतीवादी, कळपवाले, हिंदुत्व वाद्याचे हस्तक, "जात डबल" वाले व दिवसा साम्यवादी, बहुजनवादी अशा संधीसाधू लेखकरावांचे "वस्त्रहरण" करणारा हा एकमेव मराठी लेखक, त्यांच्या प्रभावी वक्तृत्वामुळे "मनाचा कट" करणारे निष्रभ ठरतात". "बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल" हा मार्शल रेसचा बाज ते सप्रमाण लिहिण्या-बोलण्यात जपतात.
पाटील यांच्या विषयी आणि त्यांच्या साहित्या विषयीचे ग्रंथ
- आनंद पर्व : तौलनिक साहित्य आणि सांस्कृतिक समीक्षा (२०१४)
- पाटलाचा कड : समग्र समीक्षा (२०११)
- पाटलाची लंडनवारी - काही दृष्टिक्षेप (२००३)
आनंद पाटील यांना मिळालेले पुरस्कार
- कागूद आणि सावली साठी महाराष्ट्र राज्य कृ.ना. आपटे उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार, मस्तप, पुणेचा ह.ना. आपटे पुरस्कार; दशकातील उत्कृष्ट महाराष्ट्र टाईम्स (१९८६)
- इच्छामरण साठी पुणे नगरवाचन श्री. ज. जोशी पुरस्कार आणि बाळापूर वाचनालयाचा कोंडीराव बाळाजी पाटील पुरस्कार (२००८)
- तौलनिक साहित्यः नवे सिद्धांत आणि उपयोजनसाठी महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट समीक्षा श्री.के.क्षीरसागर पुरस्कार (१९९९)
- मराठी नाटकावरील इंग्रजी प्रभाव साठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा म.दि. गोखले पुरस्कार (१९९८)
- ब्रिटिश बॉम्बे आणि पोर्तुगीज गोव्यातील वाङ्मय साठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा शि.म.परांजपे पुरस्कार (१९९९)
- तुळव : तौलनिक साहित्यातील निबंधासाठी जनसाहित्य परिषद अमरावतीचा जनसारस्वत पुरस्कार व विदर्भ साहित्य संघाचा युगवाणी पुरस्कार
- सृजनात्मक लेखनसाठी महाराष्ट्र राज्याच्या श्रीकक्षी पुरस्कार २००५
- टीकावस्त्रहरण साठी महाराष्ट्र राज्य कुसूमावती देशपांडे पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचा राजर्षि छ. शाहु पुरस्कार (२००८)
- साहित्य विमर्ष मरणमसाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा इ. श्री.शेणोलीकर पुरस्कार (२०११)
- ग्रंथांनी रचलेला महापुरुष : यशवंतराव चव्हाणसाठी विदर्भ इतिहास संशोधक मंडळ नागपूरचा स्वातंत्र्य सेनानी बाळाजी हु- पुरस्कार, द. महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचा आण्णाभाऊ साठे पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे-फलटण शाखेचा यशवंतराव चव्हाण साहित्य गौरव पुरस्कार, जयसिंगपूरच्या कविता सागर प्रकाशनाचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१७)
संस्थापक अध्यक्ष
- अरण्यानंद शिक्षण, साहित्य व संस्कृती प्रतिष्ठान, तळये बु । प. शिणोली, ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
- आनंद ग्रंथसागर प्रकाशन, कोल्हापूर