Jump to content

आनंद कुंभार

आनंद नागप्पा कुंभार (२७ मे, १९४१:सोलापूर - २८ नोव्हेंबर, २०१९) हे एक मराठी शिलालेख संशोधक, शिलालेख वाचक होते. त्यांनी भीमा-सीना नदी संगमावरील हत्तरसंग येथील प्राचीन संगमेश्वर मंदिरात असलेला मराठी भाषेतील सर्वात जुना शिलालेख शोधून काढला.

कुंभार यांचे शिक्षण सोलापुरातील डी. एच. खजिनदार स्कूल, नगरपालिकेची शाळा व नाईट हायस्कूल अशा तीन शाळांत झाले. १९६० ते १९६४ या काळात ते भारतीय सैन्यदलाच्या तोफखान्यात बिनतारी संदेशांच्या देवाणघेवाणीचे काम करीत होते. १९६५ ते १९६९ या काळात त्यांनी सोलापूरमधील तत्कालीन खासगी वीज कंपनीत रोजंदारीवर मीटर रीडरचे काम केले. घरी पिढीजात कुंभारकला असल्याने ते त्या कामात घरच्यांना मदत करीत.

कुंभार यांना पहिल्यापासूनच पुस्तके, नियतकालिके वाचण्याची आवड होती. त्यांनी लहानपणी विदर्भ संशोधन मंडळाच्या वार्षिकांतले इतिहास संशोधनविषयक लेख वाचले. डाॅ. वा.वि. मिराशी यांचे ताम्रपट, शिलालेख व प्राचीन नाणी या विषयांवर लेख वाचून ते मिराशींना भेटले व ह्या विषयात काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. मिराशींनी त्यासाठी इंग्लिश भाषेत गती, संस्कृतचे ज्ञान व प्राचीन लिप्यांचा अभ्यास आवश्यक असल्याचे सांगितले. कुंभारांना यांतले काहीच येत नव्हते. मग ते आधी शाळाबाह्य रीतीने एस.एस.सी पास झाले, व ग्रंथांनाच गुरू मानून त्यांनी अभ्यास सुरू केला. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळातील तात्यासाहेब खरे यांना ते भेटले आणि त्यांच्याकडून शिलालेखांचा अभ्यास कसा करावा याचे धडे घेतले. शिलालेखांचे ठसे कसे घ्यावेत याचेही ज्ञान घेतले.

सोलापूर क्षेत्राची निवड

आपल्या पुराभिलेखांच्या अभ्यासासाठी कुंभार यांनी सोलापूर क्षेत्र निवडले. सोलापूर जिल्ह्यात एकूण ११ तालुके आहेत दर शनिवार-रविवारी भटकंती करून कुंभारांनी ४ तालुक्यांत सर्वेक्षण करून शिलालेखांचे ठसे घेतले. मराठी, हिंदी, इंग्रजी, फारसीसंस्कृत भाषा ह्यांचे कामचलाऊ ज्ञान मिळवून, देवनागरीबरोबरच मोडी, कन्नडब्राह्मी लिपीतील मजकूर वाचू शकण्याइतपत त्यांनी प्रगती केली. कन्नड भाषेतील लेखांचे वाचन करण्यासाठी त्यांना धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठातील दाॅ. रित्ती यांची खूप मदत झाली. दोघांच्या सहकार्यातून व प्रयत्नांतून अज्ञात माहिती मिळू लागली. त्या माहितीवर आधारलेला 'इन्स्क्रिप्शन्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट' हा संशोधनपर ग्रंथ कुंभार-रित्ती या जोडनावाने प्रसिद्ध झाला.

मराठीतील पहिल्या शिलालेखाचा शोध

सोलापूरजवळ हत्तरसंग येथे भीमा व सीना नदी संगमावर हजाराहून अधिक वर्षे अस्तित्वात असलेल्या संगमेश्वर मंदिरातील मराठी शिलालेख सर्वप्रथम कुंभार यांनी शोधून काढला होता. इतिहासात मराठीतील पहिला शिलालेख कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील बाहुबली मंदिरात असल्याचा सार्वत्रिक समज होता. परंतु हत्तरसंग येथील संगमेश्वर मंदिरातील मराठीतील शिलालेख शके ९४० कालयुक्त संवत्सर माघ शुद्ध प्रतिपदा म्हणजे फेब्रुवारी १०१९ या काळात लिहिला गेला आहे. वांछितो विजया हाऐवा ही मराठी भाषेतील ओळ या शिलालेखावर सापडली. मराठीत अस्तित्वात असलेला हा पहिलाच शिलालेख असण्याबाबत नंतर शिक्कामोर्तब झाले. याकामी कुंभार यांनी केलेले संशोधनकार्य इतिहासात नोंद घ्यावी, असेच झाले आहे.

घर आणि ग्रंथालय

आनंद कुंभार यांचे सोलापुरातील राहते घरदेखील पन्हाळी पत्र्यांचे छत असलेले अतिशय साधेसुधे होते. त्या घरात कुंभार यांनी सुमारे सत्तर हजार दुर्मीळ पुस्तकांचा खजिना जतन करून ठेवला आहे. त्यांच्या या सुमारे साठ दशकांच्या काळातल्या शिलालेखांच्या संशोधनातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

प्रकाशित साहित्य

  • 'इन्स्क्रिप्शन्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट' हा ग्रंथ
  • संशोधन तरंग (देवनागरीतील शिलालेखांच्या माहितीवरील स्फुट लेखसंग्रह) - या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला.
  • बाराव्या शतकातील शिवशरण शिवयोगी सोन्नलिगे यांच्याशी संबंधित चार लेख प्रकाशात आणले.
  • गिरिजा कल्याण ऊर्फ विवाहपुराण नावाचा शिलालेखित ग्रंथ शोधून काढला. या शोधामुळे कलचुरी सम्राट बिज्जलदेव (दुसरा) याच्या पट्टराणीचे नाव रंभादेवी असल्याचे पहिल्यांदाच समजले.
  • देवगिरीचा शेवटचा राजा सिंघणदेव (तिसरा) ऊर्फ शंकरदेव याचा लेख मोहोळ येथे सापडवला.
  • कलचुरी राजघराण्यातील शासक महामंडलेश्वर अमुलगी याचे तीन लेख शोधून काढले.
  • त्या घराण्यातील राजा बिज्जलदेव (दुसरा) याचा महामंडलेश्वर झाला असल्याचा उल्लेख असलेला लेख शोधून काढला.

पुरस्कार आणि सन्मान

  • सोलापूर विद्यापीठ आणि सोलापुरातील अन्य संस्थानांकडून जाहीर सत्कार.

संदर्भ