आनंदडोह
आनंदडोह हे संत तुकारामांच्या जीवनावरती लिहिलेले नाटक आहे. नाटकाचे लेखन आनंद स्वरूप यांनी केले आहे तर, संगीत केदार दिवेकर यांचे आहे. निर्मिती श्री राजयोगतर्फे करण्यात आली आहे. रंगमंचावर हे नाटक एकपात्री स्वरूपात योगेश सोमण सादर करतात.
तुकाराम महाराजांनी गाथा इंदायणीच्या डोहात बुडवण्यापासून ते बाहेर काढेपर्यंतचा प्रवास ’आनंडडोह’च्या कथानकात, तुकारामांचा स्वतःच्या आत्म्याशी घडलेला स्वगत स्वरूपातील संवाद आणि अभंगांतून प्रेक्षकांसमोर येतो.
’आनंदडोह’ या नाटकाची पहिली दोन खासगी वाचने पुण्यात झाली आणि त्यानंतर १ एप्रिल २००९ रोजी पहिला जाहीर एकपात्री प्रयोग समर्थ रामदासस्वामींच्या जांब या गावी झाला. सादरकर्ते योगेश सोमण होते.
या एकपात्री प्रयोगाचे केवळ १० महिन्यांत १०४ प्रयोग झाले असून १०५ वा प्रयोग २१ मार्च २०१०रोजी पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात झाला. त्यानंतरही ’आनंडडोह’चे प्रयोग होतच राहिले. विशेषतः पंढरपूरच्या वारीदरम्यान वारीमार्गावर हे प्रयोग वारकऱ्यांसाठी करण्यात आले. ’आनंदडोह’चा १२५वा प्रयोग ६ जुलै २०१० रोजी झाला.
या आनंडडोह नाटकाच्या प्रयोगांचे मानधन वजा जाता उरलेल्या रकमेतून दरवर्षी एका व्यक्तीला किंवा संस्थेला ’आनंडडोह पुरस्कार’ देण्याचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. साधारणपणे संत साहित्याचे अभ्यासक आणि कलावंतांना हा पुरस्कार देण्यात येतो.
आत्तापर्यंत आनंदडोह हा पुरस्कार
- डॉ. सदानंद मोरे (२०११)
- अखिल बुधवार पेठ देवदासी संस्था (२०१२) आणि
- मुक्ता गरसोळे-कुलकर्णी (२०१३) यांना मिळाला आहे.
डीव्हीडी
एकपात्री नाटकाच्या माध्यमातून संत तुकारामांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवावेत, यासाठी उभ्या राहिलेल्या 'आंनदडोह' या एकपात्री नाटकाच्या डीव्हीडीचे प्रकाशन २०११ सालच्या आषाढी एकादशीला झाले.