आत्माराम पांडुरंग तर्खडकर
डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर | |
---|---|
जन्म | आत्माराम २३ डिसेंबर १८२३ |
मृत्यू | २६ एप्रिल १८९८ |
टोपणनावे | डॉ. आत्माराम, डा. आत्माराम |
प्रसिद्ध कामे | परमहंससभेची स्थापना |
वडील | पांडुरंग यशवंत तर्खडकर |
आई | यशोदाबाई पांडुरंग तर्खडकर |
नातेवाईक | दादोबा पांडुरंग तर्खडकर (भाऊ) |
आत्माराम पांडुरंग तर्खडकर (जन्म २३ डिसेंबर १८२३[१] - मृत्यू २६ एप्रिल १८९८) तथा डॉ. आत्माराम हे परमहंससभेच्या संस्थापकांपैकी एक होते. तसेच ते प्रार्थना समाजाचेही संस्थापक सदस्य होते. ते प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. ते मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे धाकटे भाऊ होते.
शिक्षण
आत्माराम ह्यांचे प्राथमिक शिक्षण तत्कालीन पद्धतीनुसार पंतोजींच्या शाळेत झाले. त्यानंतर इंग्रजी शिक्षणासाठी ते हैंदशाळामंडळीच्या (नेटिव्ह-एज्युकेशन-सोसायटीच्या) शाळेत दाखल झाले. १८४५ ह्या वर्षी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी त्यांनी त्याच वर्षी स्थापन झालेल्या ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. ह्या महाविद्यालयाच्या पहिल्या चार पदवीधरांपैकी डॉ. आत्माराम हे एक होते.[२]
मानसन्मान
डॉ. आत्माराम हे मुंबई विद्यापीठाचे फेलो होते. त्यांनी मुंबईचे नगरपाल (शेरिफ) हे पदही भूषवले. महानगरपालिकेचे ते अनेक वर्षे सदस्य होते. तसेच मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते उपाध्यक्षही होते. [३]
धर्मसुधारणेच्या चळवळीतील सहभाग
दादोबा पांडुरंग, राम बाळकृष्ण, रा. गो. भांडारकर इ. सहकाऱ्यांसह परमहंससभा स्थापन करण्यात डॉ. आत्माराम ह्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. तसेच प्रार्थनासमाजाची स्थापना १८६७ ह्या वर्षी झाली तेव्हा डॉ. आत्माराम हे प्रार्थनासमाजाचे अध्यक्ष होते.
संदर्भ
संदर्भसूची
- वैद्य, द्वारकानाथ गोविंद (१९२७), प्रार्थनासमाजाचा इतिहास (ह्या पुस्तकातील चरित्रात्मक लेख हा विभाग), मुंबई: प्रार्थनासमाज