आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था International Atomic Energy Agency | |
---|---|
ध्वज | |
प्रकार | संस्था |
सदस्य | १५१ सदस्य देश खाली पहा |
मुख्य | युकिया अमानो |
स्थिती | कार्यरत |
स्थापना | १९५७ |
मुख्यालय | व्हियेना, ऑस्ट्रिया |
संकेतस्थळ | www.iaea.org/ |
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (आंअसं), (इंग्लिश: International Atomic Energy Agency (IAEA)) ही अणुकेंद्रकीय ऊर्जेच्या शांततामय वापराचा प्रसार करणारी आणि आण्विक शस्त्रांसाठीच्या लष्करी उद्देशासाठी तिचा वापर करण्यास प्रतिबंध घालणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. एक स्वतंत्र संस्था म्हणून २९ जुलै १९५७ रोजी ’आंअसं’ची स्थापना केली गेली. ‘आंअसं संविधी’ या संयुक्त राष्ट्रांहून अलग अशा सनदेने स्वतःच्या वेगळ्या आंतरराष्ट्रीय करारातून ही संस्था जन्माला आली असली तरी ती संयुक्त राष्ट्रे आमसभा आणि सुरक्षा समिती या दोहोंना आपल्या कार्याची माहिती देते.
‘आंअसं’चे मुख्यालय ऑस्ट्रियातील व्हियेना येथे आहे. कॅनडाच्या ओंटारियो प्रांतातील टोरोन्टो इथे आणि जपानमधील टोक्योत अशी ’आंअसं’ची दोन “विभागीय खबरदारी कार्यालये” आहेत. याव्यतिरिक्त तिची दोन संबंध कार्यालये न्यू यॉर्क प्रांतातील त्याच नावाच्या शहरी आणि स्वित्झर्लंडमधील जिनिव्हात आहेत. याशिवाय ऑस्ट्रियातील विएन्ना व सिबेर्सडॉर्फ इथे आणि मोनॅकोत ’आंअसं’च्या प्रयोगशाळा आहेत. जगभरातील आण्विक तंत्रज्ञानाच्या आणि आण्विक शक्तीच्या शांततापूर्ण कार्यातील शास्त्रीय आणि तांत्रिक सहकार्यासाठी ’आंअसं’ आंतरशासकीय मंच म्हणून कार्य करते. ’आंअसं’चे कार्यक्रम आण्विक तंत्रज्ञानाच्या शांततामय वापरांच्या विकासासाठी प्रोत्साहन देतात, आण्विक तंत्रज्ञान आणि आण्विक द्रव्यांच्या गैरवापराविरूद्ध आंतरराष्ट्रीय खबरदारी घेतात आणि आण्विक सुरक्षा (विकिरण संरक्षणासह) व आण्विक सुरक्षा प्रमाणकांचा आणि त्यांच्या अंमलबजावणीचा पुरस्कार करतात.
’आंअसं’ आणि तिचे माजी महानिदेशक मोहमद अल बर्देई यांना ७ ऑक्टोबर २००७ रोजी नोबेल शांतता पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला. युकिया अमानो हे ’आंअसं’चे सध्याचे महानिदेशक आहेत.
सदस्य
जगातील १५१ देश ह्या संस्थेचे सदस्य आहेत. संयुक्त राष्ट्रे सदस्य देशांपैकी बहुतेक देशांचा ह्या यादीत समावेश आहे. केप व्हर्दे, पापुआ न्यू गिनी, रवांडा व टोगो ह्या देशांची सदस्यता मान्य करण्यात आली आहे. खालील देश आंअसंचे सभासद नाहीत.
- आंदोरा
- अँटिगा आणि बार्बुडा
- बहामास
- बार्बाडोस
- भूतान
- कोमोरोस
- काँगोचे प्रजासत्ताक
- डॉमिनिका
- इक्वेटोरीयल गिनी
- फिजी
- गांबिया
- ग्रेनेडा
- गिनी
- गिनी-बिसाउ
- गयाना
- किरिबाटी
- लाओस
- मालदीव
- मायक्रोनेशियाची संघीय राज्ये
- नौरू
- सेंट किट्स आणि नेव्हिस
- सेंट लुसिया
- सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
- सामोआ
- सान मारिनो
- साओ टोमे व प्रिन्सिप
- सॉलोमन द्वीपसमूह
- सोमालिया
- सुरिनाम
- इस्वाटिनी
- पूर्व तिमोर
- टोंगा
- त्रिनिदाद आणि टोबॅगो
- तुर्कमेनिस्तान
- तुवालू
- व्हानुआतू
- उत्तर कोरिया